आचार्य नन्दिकेश्वर - संस्कृत साहित्य इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तित्व म्हणजे आचार्य नन्दिकेश्वर हे होय. नन्दिकेश्वर अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. व्याकरण, नाट्यशास्त्र, संगीत, शैवदर्शंन, मीमांसा, कामसूत्र आदि शास्त्रावरील त्यांच्या रचना सर्वप्रसिद्ध आहेत. अभिनयदर्पण, भरतार्णव, नन्दिकेश्वरकाशिका व इतर ग्रंथसंपदेवरुन नन्दिकेश्वर हे एक पौराणिक व्यक्तिमत्व होते असे लक्षात येते. तसेच ‘लिंगधारणचंद्रिका’ या वीरशैवसिद्धांत दर्शन प्रतिपादक ग्रंथात शैवागम, श्रुती व स्मृती साहित्यातील समन्वयदृष्टी पहावयास मिळते. नाट्यशास्त्रात त्यांना भरत यांचा शिक्षक व कामसूत्र ग्रंथात त्यांना कामशास्त्रप्रवक्ता म्हणून संबोधिले आहे.[i] संस्कृत साहित्यात नन्दिकेश्वर यांची नावे – १ नन्दिकेश्वर,[ii] २ नन्दिकेशान,[iii] ३ नन्दिकेश,[iv] ४ नन्दीश्वर,[v] ५ नन्दीश,[vi] ६ नन्दिन्,[vii] ७ नन्दी,[viii] ८ शैलादि,[ix] ८ नन्दिभरत,[x] ९ तण्डु [xi] याप्रमाणे विविध ग्रंथात नन्दिकेश्वर यांचा नाम उल्लेख आलेला आहे. याविषयी पुराण, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र व अन्य ग्रंथात विवरण प्राप्त होते, यावरुन नन्दिकेश्वर शिलादपूत्र, शिवाचे अनन्यभक्त, अन्तेवासी व प्रमुख शिवगण होते. नन्दिकेश्वर यांची मूर्ती [xii] आचार्य नन्दिकेश्वर यांचा देश व काल - डॉ.मनमोहन घोष यांच्या मते नन्दिकेश्वर हे दाक्षिणात्य होते, कारण दक्षिण भारतात मंदिरामध्ये आजही नन्दीची मूर्ती पाहावयास मिळते व तिचा पूजाही होते. तसेच ‘अभिनयदर्पण’ व ‘भरतार्णव’ यांच्या पांडूलिपी दक्षिणभारतात व तेलगु भाषेत प्राप्त आहेत. यावरून असे सिद्ध होते की नन्दिकेश्वर दाक्षिणात्य होते. कालमानाविषयी नाट्यशास्त्र व अर्थशास्त्र यांचा कालखंड इसवीपूर्व पाचवे शतक मानला जातो यावरुन नन्दिकेश्वर यांचा कालावधी इसवी पूर्व पाचवे शतक ते सहावे शतक या दरम्यान किंवा आसपासचा असावा असे मत डॉ. पारससाथ द्विवेदी यांनी मांडले आहे.[xiii] तसेच पाणिनी व नन्दिकेश्वर या दोघांनी १४ माहेश्वर सूत्रांना आधारभूत मानून व्याकरणग्रंथ रचना केली, त्यावरून हे दोघेही इसवी पूर्व सहाव्या शतकात होऊन गेले असावेत, असे मत मांडले आहे.[xiv] तर आधुनिक अन्तःक्षेत्रमाध्यमाद्वारे प्रकाशित कोशात नन्दिकेश्वर यांचा कालखंड इसवी पूर्व २५० वर्ष मानलेला आहे.[xv] आचार्य नन्दिकेश्वर यांच्या रचनाः १ नन्दिकेश्वरसंहिता (नंदीश्वरसंहिता), २ अभिनयदर्पण, ३ भरतार्णव, ४ नन्दिकेश्वर-काशिका, ५ रुद्रडमरुद्भवसूत्राविवरण, ६ नन्दिभरत, ७ भरतार्थचन्द्रिका, ८ ताललक्षण, तालादिलक्षण, तालाभिनय लक्षण, ९ नन्दिकेश्वरतिलक, १० योगतारावली, ११ प्रभाकरविजय, १२ लिंगधारणचंद्रिका नन्दिकेश्वरकाशिका ‘नन्दिकेश्वरकाशिका’ ही माहेश्वरसूत्रावरील शैवदर्शन प्रतिपादन करणारी प्रमाणित व्याख्या आहे. नन्दिकेश्वरकाशिकेनुसार भगवान शिवांनी सनक, सनन्दन व सनतकुमार या सिद्धांच्या उद्धाराकरीता नृत्यसमयी १४ वेळा डमरू वाजविला. त्यातून १४ सूत्रांचा बोध झाला. व्याख्याकार उपमन्यु यांच्या अनुसार १४ सूत्र डमरूच्या नादातून प्राप्त झाल्यावर त्याचे रहस्य केवळ नन्दिकेश्वर यांना माहित होते म्हणून सर्व मुनींनी नन्दिकेश्वर यांना प्रश्न विचारले. तेव्हा नन्दिकेश्वर यांनी ३६ कारिकांमध्ये १४ माहेश्वरसूत्रांची व्याख्या केली.[xvi] तर काही ठिकाणी कारिकांची संख्या २७ अशी नमूद करण्यात आली आहे. नागेशभट्टांनी सुद्धा ‘शब्देन्दुशेखर’ ग्रंथात नन्दिकेश्वर यांचा उल्लेख ‘शिवसूत्रांचे भाष्यकार’ असाच केला आहे. आज उपलब्ध व्यांख्यामध्ये शिवसूत्रावरील व्याख्या दार्शनिक दृष्टीने सर्वश्रेष्ठ मानली जाते. उपमन्युने या ग्रंथावर ‘तत्त्वविमर्शिणी’ नावाची टीका लिहीली आहे. नन्दिकेश्वरकाशिका- १४ माहेश्वरसूंत्राचे शैवदर्शनानुसार विवेचन – नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारम्। उद्धर्तुकामः सनकादिसिद्धानेतद्विमर्शे शिवसूत्रजालम्॥ १॥
अत्र सर्वत्र सूत्रेषु अन्त्यवर्णचतुर्दशम्। धात्वर्थं समुपादिष्टं पाणिन्यादीष्टसिद्धये॥ २॥ ॥ अइउण्॥ १॥
अकारो ब्रह्मरूपः स्यान्निर्गुणः सर्ववस्तुषु। चित्कलामिं समाश्रित्य जगद्रूप उणीश्वरः॥ ३॥
अकारः सर्ववर्णाग्र्यः प्रकाशः परमेश्वरः। आद्यमन्त्येन संयोगादहमित्येव जायते॥ ४॥
सर्वं परात्मकं पूर्वं ज्ञप्तिमात्रमिदं जगत्। ज्ञप्तेर्बभूव पश्यन्ती मध्यमा वाक ततः स्मृता॥ ५॥
वक्त्रे विशुद्धचक्राख्ये वैखरी सा मता ततः। सृष्ट्याविर्भावमासाद्य मध्यमा वाक समा मता॥ ६॥
अकारं सन्निधीकृत्य जगतां कारणत्वतः। इकारः सर्ववर्णानां शक्तित्वात् कारणं गतम्॥ ७॥
जगत् स्रष्टुमभूदिच्छा यदा ह्यासीत्तदाऽभवत्। कामबीजमिति प्राहुर्मुनयो वेदपारगाः॥ ८॥
अकारो ज्ञप्तिमात्रं स्यादिकारश्चित्कला मता। उकारो विष्णुरित्याहुर्व्यापकत्वान्महेश्वरः॥ ९॥ ॥ ऋऌक्॥ २॥
ऋऌक् सर्वेश्वरो मायां मनोवृत्तिमदर्शयत्। तामेव वृत्तिमाश्रित्य जगद्रूपमजीजनत्॥ १०॥
वृत्तिवृत्तिमतोरत्र भेदलेशो न विद्यते। चन्द्रचन्द्रिकयोर्यद्वद् यथा वागर्थयोरपि॥ ११॥
स्वेच्छया स्वस्य चिच्छक्तौ विश्वमुन्मीलयत्यसौ। वर्णानां मध्यमं क्लीबमृऌवर्णद्वयं विदुः॥ १२॥ ॥ एओङ्॥ ३॥
एओं मायेश्वरात्मैक्यविज्ञानं सर्ववस्तुषु। साक्षित्वात् सर्वभूतानां स एक इति निश्चितम्॥ १३॥ ॥ ऐऔच्॥ ४॥
ऐऔच् ब्रह्मस्वरूपः सन् जगत् स्वान्तर्गतं ततः। इच्छया विस्तरं कर्त्तुमाविरासीन्महामुनिः॥ १४॥ ॥ हयवरट्॥ ५॥
भूतपंचकमेतस्माद्धयवरण्महेश्वरात्। व्योमवाय्वम्बुवह्न्याख्यभूतान्यासीत् स एव हि॥ १५॥
हकाराद् व्योमसंज्ञं च यकाराद्वायुरुच्यते। रकाराद्वह्निस्तोयं तु वकारादिति सैव वाक्॥ १६॥ ॥ लण्॥ ६॥
आधारभूतं भूतानामन्नादीनां च कारणम्। अन्नाद्रेतस्ततो जीवः कारणत्वाल्लणीरितम्॥ १७॥ ॥ ञमङणनम्॥ ७॥
शब्दस्पर्शौ रूपरसगन्धाश्च ञमङणनम्। व्योमादीनां गुणा ह्येते जानीयात् सर्ववस्तुषु॥ १८॥ ॥ झभञ्॥ ८॥
वाक्पाणी च झभञासीद्विराड्रूपचिदात्मनः। सर्वजन्तुषु विज्ञेयं स्थावरादौ न विद्यते॥ वर्गाणां तुर्यवर्णा ये कर्मेन्द्रियमया हि ते॥ १९॥ ॥ घढधष्॥ ९॥
घढधष् सर्वभूतानां पादपायू उपस्थकः। कर्मेन्द्रियगणा ह्येते जाता हि परमार्थतः॥ २०॥ ॥ जबगडदश्॥ १०॥
श्रोत्रत्वंनयनघ्राणजिह्वाधीन्द्रियपंचकम्। सर्वेषामपि जन्तूनामीरितं जबगडदश्॥ २१॥ ॥ खफछठथचटतव्॥ ११॥
प्राणादिपंचकं चैव मनो बुद्धिरहंकृतिः। बभूव कारणत्वेन खफछठथचटतव्॥ २२॥ वर्गद्वितीयवर्णोत्थाः प्राणाद्याः पंच वायवः। मध्यवर्गत्रयाज्जाता अन्तःकरणवृत्तयः॥ २३॥ ॥ कपय्॥ १२॥
प्रकृतिं पुरुषंचैव सर्वेषामेव सम्मतम्। सम्भूतमिति विज्ञेयं कपय् स्यादिति निश्चितम्॥ २४॥ ॥ शषसर्॥ १३॥
सत्त्वं रजस्तम इति गुणानां त्रितयं पुरा। समाश्रित्य महादेवः शषसर् क्रीडति प्रभुः॥ २५॥
शकारद्राजसोद्भूतिः षकारात्तामसोद्भवः। सकारात्सत्त्वसम्भूतिरिति त्रिगुणसम्भवः॥ २६॥ ॥ हल्॥ १४॥
तत्त्वातीतः परं साक्षी सर्वानुग्रहविग्रहः। अहमात्मा परो हल् स्यामिति शम्भुस्तिरोदधे॥ २७॥ ॥ इति नन्दिकेश्वरकृता काशिका समाप्ता॥[xvii] अशा प्रकारे उपरोक्त प्रतीत २७ कारिकामध्ये नन्दिकेश्वर यांनी १४ माहेश्वरसूत्रांवर शैवसिद्धांत सम्मत विवेचन केलेले आहे. यात शिव-शक्ती, परब्रह्म, आत्मा, प्रकृति, गुणत्रय, पंचप्राण, कोशत्रय, अन्तःकरणचतुष्टय, पंचवायु, पंचप्राण, इंन्द्रिये, विषय, महाभूतादी सर्वांचे विवेचक स्वरूप माहेश्वरसूत्राच्या माध्यमातून नन्दिकेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. व्याकरण केवळ प्रकृति-प्रत्यय नसून ते एक दर्शन आहे ही अवधारणा रोपित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आचार्य नन्दिकेश्वर यांनी केले आहे. संस्कृत व्याकरणाच्या मूलस्त्रोताकडे जावयाचे असेल तर ‘नन्दिकेश्वर-काशिका’ ग्रंथाचे अध्ययन अध्यापन आवश्यक आहे.
[i] आचार्य नन्दिकेश्वर और उनका नाट्य साहित्य, डाँ पारसनाथ द्विवेदी, संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी.१९८९ [ii] भरतार्णव १३७, ६३८, ७०५, ७६४ तथा नन्दिकेश्वरकाशिका उपमन्युकृत टीका, पृ.०१ [iii] भरतार्णव ६६६, ७६५, ८८९, ९७४ [iv] भरतार्णव १९३, ७७१, ९२३ तथा नन्दिकेश्वरकाशिका उपमन्युकृत टीका, पृ.०१ [v] लिंगपूराण पूर्वार्ध अध्याय ४२-४४ तसेच कूर्मपूराण उत्तरार्ध अध्याय ४३, हरिवंश पुराण १८२।८६ व वाराहपूराण [vi] Ibid [vii] नाट्यशास्त्र, चौखम्बा प्रकाशन, वाराणसी,३।३, ३।३१ [viii] लिंगपूराण पूर्वार्ध अध्याय ४२-४४ तसेच कूर्मपूराण उत्तरार्ध अध्याय ४३, हरिवंश पुराण १८२।८६ व वाराहपूराण [ix] भरतार्णव ६६०, ७७४, ७८६ [x] बृहद्देशी (मतङ्ग) पृ.३२, काव्यमीमांसा (राजशेखर) १।१ संगीतरत्नाकर (शार्ङ्गदेव) १।१७ [xi] अभिनयदर्पण ४-५ तसेच नाट्यशास्त्र ४ अध्याय. [xii]https://www.catawiki.com/en/l/28669257-sculpture-1-bronze-nandikeshwara-india-second-half-20th-century [xiii] आचार्य नन्दिकेश्वर और उनका नाट्य साहित्य, डाँ पारसनाथ द्विवेदी, संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी.१९८९ अध्याय१. पृ. २२ [xiv] Ibid पृ.२९ [xv] https://hi.wikipedia.org/wiki/नन्दिकेश्वरकाशिका [xvi] नन्दिकेश्वरकाशिका, पृ.०१ [xvii] https://hi.wikipedia.org/wiki/नन्दिकेश्वरकाशिका